Ladki Bahin Yojana Patsanstha Registration Maharashtra 2025 : महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आर्थिक संधी उगम पावत आहे. ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतून मिळणाऱ्या मासिक मदतीपलीकडे आता लाडक्या बहिणींना स्वतःची पतसंस्था सुरू करण्याचा मार्ग खुला होत आहे.
राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीं महिलांना आता स्वतःची महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करता येणार आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नुकतीच ही घोषणा केली असून, पतसंस्था नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक अटी व शर्तीही स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
Ladki Bahin Yojana Patsanstha – या निर्णयामुळे काय बदलणार आहे?
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना केवळ दरमहा आर्थिक मदत न देता, त्यांना आता स्वयंरोजगार, गुंतवणूक आणि बचतीचा एक शाश्वत पर्याय मिळणार आहे. सहकार विभागाच्या मार्गदर्शनाखाली या पतसंस्था काम करतील. प्रत्येक संस्थेला एक पालक अधिकारी नियुक्त केला जाणार असून, तो कर्ज व्यवहार, लेखा तपासणी, सभांचे इतिवृत्त, आणि कायदेशीर मार्गदर्शन अशा बाबतीत सहकार्य करेल.
नोंदणीसाठी निकष काय असतील?
पतसंस्था नोंदणी करताना नगर आणि ग्रामीण क्षेत्रानुसार आवश्यक सदस्यसंख्या आणि भागभांडवल वैगवेगळ असेल. उदाहरणार्थ:
मुंबई/ठाणे: किमान 2000 सदस्य व ₹30 लाख भागभांडवल
गाव कार्यक्षेत्र: 250 सदस्य व ₹1.5 लाख भागभांडवल
तालुका स्तर: 500 सदस्य व ₹5 लाख भागभांडवल
प्रत्येक कार्यक्षेत्रासाठी अशी वेगवेगळी अट ठेवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, 100% KYC, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले प्रवर्तक, महिला बालविकास विभागाची मान्यता असलेली यादी इत्यादी अटी बंधनकारक आहेत.
महिला सशक्तिकरणाची नवी दिशा
या योजनेद्वारे सरकारचा उद्देश महिलांना दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबी बनवणे हा आहे. मासिक ₹1500 च्या थेट लाभापासून सुरू झालेला महिलांचा प्रवास आता पतसंस्थेच्या माध्यमातून बचत, कर्ज, गुंतवणूक आणि सूक्ष्म उद्योजकतेपर्यंत पोहोचत आहे.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या म्हणण्यानुसार, “या निर्णयामुळे ‘लाडकी बहिण’ योजना आता एका निव्वळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित राहत नाही, तर ती महिला उद्योजकता आणि आर्थिक सक्षमीकरणाची चळवळ बनणार आहे.”
हेही वाचा : मोफत पीठ गिरणी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी ही महत्वाची माहिती वाचाच!.